शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन

  • Post author:
  • Post category:KVK

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यातील लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसह अनेक भागात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांमध्ये रोपावस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे या किडीवर सामूहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शंखी गोगलगाय ओळख:

शंखी गोगलगाय (स्नेल) हा प्राणी मोल्युस्का या मृद्‍काय गटातील असून, गॅस्ट्रोपोडा (उदरपाद) वर्गात समाविष्ट आहे. मोल्युस्का हा कीटकानंतर संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा प्राणिवर्गीय गट आहे. मागील खरीप हंगामात आढळलेली शंखी गोगलगाय ही आफ्रिकन जॉइंट स्नेल (शास्त्रीय नाव: अचेटिना फुलिका) आहे. जगात अंदाजे ३५,००० पेक्षा जास्त गोगलगायीच्या प्रजाती असून, भारतात १,४५० प्रजातींची नोंद आहे. या किडीचे उगम स्थान पूर्व आफ्रिका आहे. भारतामध्ये गोगलगायींचा प्रसार सर्वप्रथम १८४७ मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकात्यात झाला आणि तिथून तिचा प्रसार महाराष्ट्रासह एकूण १२ राज्यांमध्ये झाला. आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटनेने (IUCN) गोगलगायींचा समावेश जगातील शंभर सर्वात जास्त उपद्रवी किडींच्या प्रजातींमध्ये केला आहे.

शंखी गोगलगाय ओळख:

शंखी गोगलगायीच्या पाठीवर ४ ते ५ इंच (१० ते १२ सेंमी) लांबीचे ७-९ चक्र असलेले गोलाकार टणक असे कवच (शंख) असते. सरासरी वजन ३२ ग्रॅमपेक्षा जास्त, बहुतांशी शंखी गर्द, करडा, फिक्कट किंवा हिरवा काळपट रंगाच्या असतात.

प्रजनन आणि जीवनक्रम:

शंखी गोगलगायी (अचेटिना फ्युलिका) उभयलिंगी असतात. दोन गोगलगायींचे मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते. यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. गोगलगायांची जीवनक्रम तीन अवस्थांमध्ये होतो: अंडी, पिले आणि प्रौढ. मिलनानंतर ८-२० दिवसांनी गोगलगाय ओलसर जमिनीमध्ये २०० अंडी देते. एका वर्षात ती ५-६ पुंजके घालते. पहिल्या वर्षी एक गोगलगाय १००, तर दुसऱ्या वर्षांपासून ५०० पर्यंत अंडी घालते. अंडी ४.५-५.५ मिमी व्यासाची असतात. २४-२८ अंश सेल्सिअस तापमानात एक-दोन आठवड्यांत लहान गोगलगायी बाहेर पडतात. ५-६ महिन्यांत प्रौढ होऊन मिलनास प्रारंभ करतात. त्यांचे आयुष्यमान ५ ते ६ वर्षे असते.

अधिवास आणि पोषक वातावरण:

गोगलगायी साधारणतः निशाचर असल्या तरी ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणात दिवसाही सक्रिय असतात. ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात संख्या झपाट्याने वाढते. सूर्यप्रकाशापासून दूर झाडझाडोऱ्यांच्या आडोशाला सावलीत, पाण्याजवळ थंड व ओलसर जमिनीत गोगलगायींचा अधिवास असतो. हिवाळ्यामध्ये त्या जमिनीमध्ये सुप्तावस्थेत जातात.

गोगलगाय व्यवस्थापन उपाय:

१) प्रतिबंधात्मक उपाय योजना:

  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, ज्यामुळे गोगलगायी सुप्तावस्थेतून बाहेर येऊन नष्ट होतील.
  • दिवसा लपलेल्या गोगलगायी जमा करून नष्ट कराव्यात.
  • हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सामूहिकरीत्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.
  • शेताच्या बांधाजवळ तंबाखू भुकटी, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा पट्टा आखावा.

२) नियंत्रणात्मक उपाययोजना:

  • संध्याकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.

  • शेतात ७-८ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषाचे ढीग ठेवावेत किंवा ओल्या गोणपाटावर आंबट गोड वासासाठी गुळाचे पाणी, फळांचे राहिलेले अवशेष, उसाची मळी,कोबी अथवा पपईची पाने बारीक करून ठेवावीत. त्याकडे आकर्षित झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे. लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची फवारणी करावी.

  • जास्त तापमान व कमी आर्द्रता असलेल्या स्थितीमध्ये मेटाल्डिहाइड हे गोगलगायनाशक प्रभावी ठरते. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाइड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे. मेटाल्डिहाइड या गोगलगाय नाशकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

  • आर्द्रता जास्त असताना मेटाल्डिहाइडला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर २ किलो प्रति एकर या प्रमाणे आमिष म्हणून वापरता येते. आयर्न फॉस्फेटच्या संपर्कात आल्यास गोगलगायी उपाशी राहून मरतात. मात्र स्पिनोसॅड ४ मिलि प्रति २ किलो आयर्न फॉस्फेटमध्ये मिसळून वापरल्यास अधिक परिणामकारक ठरते. आयर्न फॉस्फेट हे पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित आहे. 

शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी वरील सर्व उपाययोजना एकत्रितपणे राबवणे गरजेचे आहे, त्यामुळे या उपद्रवी किडीचे नियंत्रण करता येईल आणि पिकांचे नुकसान टाळता येईल.